अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेची मशाल धगधगली, लटकेंचा विजय; भाजपच्या ‘नोटा’चा पराभव!

मुंबई : (Rutuja Latke Win On Andheri By Election) अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या सध्या विजयाच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत. अंधेरीत रविवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. आतापर्यंत मतमोजणीच्या एकूण आठरा फेऱ्या पार पडल्या असून यामध्ये ऋतुजा लटके यांना 65,335 मतं मिळाली आहेत. तर या निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या नोटा या पर्यायाला 12691 मतं मिळाली आहेत.

त्यामुळे एका बाजूला ऋतुजा लटके यांच्या यशाचे ढोल बडवले जात असले तरी नोटा फॅक्टरही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून ऋतुजा लटके विरुद्ध नोटा अशी लढाई पाहायला मिळत आहे. नोटा फॅक्टरने ऋतुजा लटके यांना एकदाही आव्हान दिले नसले तरी आतापर्यंत पडलेली 12691 मतं ही लक्षणीय मानली जात आहेत. या निवडणुकीत ‘नोटा’चा फॅक्टर राबवला असल्याचे दिसून आलं.

मुरजी पटेल यांच्या माघारीनंतर नोटाला मतदान करण्याचे आवाहन करणारी ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लिप पटेल समर्थकांची असल्याची चर्चा होती. त्यामुळे या पोटनिवडणुकीत नोटाला किती मते मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. त्यामुळे ही निवडणूक शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध नोटा अशी होणार असल्याची चर्चा जोर पकडू लागली होती.  नोटांचा वापर करुन ‘नोटा’ला मतदान करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला होता.  

Prakash Harale: