मुंबई | सेक्रेड गेम्स (Sacred Games) या वेब सीरिजमध्ये कुक्कुची भूमिका साकारून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री कुब्रा सैत (Kubbra Sait) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या विषयांवर मतं ती सोशल मीडियावर मांडत असते. काही दिवसांपूर्वी तिने ‘ओपन बुक: नॉट क्वाएट अ मेमॉइर’ या पुस्तकात लैंगिक शोषणाचा (sexually abused) खुलासा केला आहे. कुब्रानं पुस्तकामध्ये तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाची माहिती दिली आहे. याच पुस्तकात कुब्राने मालदीवमधील एका धक्कादायक प्रसंगाविषयी खुलासा केला आहे.
मालदीव येथे एका लग्नाच्या संगीत समारंभाचं सूत्रसंचालन करायचं काम कुब्राकडे आलं होतं. नवऱ्या मुलाच्या आईने कुब्राशी संपर्क साधून तिच्या मानधनाविषयी आणि येण्या जाण्याच्या विमान तिकीटाच्या खर्चाविषयी चर्चा करून कुब्राला या समारंभाचं आमंत्रण दिलं होतं.
त्यावेळी नवऱ्या मुलाच्या आईने कुब्राला एक वेगळी गोष्ट सांगितली. त्यांच्या मुलाचे हे दुसरे लग्न असल्याने यावर त्यांना जास्त खर्च करता येणार नसल्याने कुब्रासह इतर कलाकारांची राहण्याची सोय बोटवर करण्यात आली असल्याचं त्यांनी कुब्राला सांगितलं. कुब्राने यासाठी स्पष्टपणे नकार दिला अन् तिला राहायला रूम मिळाली नाही तर ती आल्या पावली परत जाईल असंही अभिनेत्रीने स्पष्ट केलं. कुब्रा तिच्या अटीवर अडून राहिली त्यामुळे तिच्यासाठी खास रूमची सोय करण्यात आली आणि तिच्याविषयी त्या समारंभात बऱ्याच वाईट गोष्टी बोलल्या गेल्या.
संगीत समारंभाचं सूत्रसंचालन करून झाल्यावर तिथे एक पार्टी सुरू झाली अन् ते पाहून कुब्राला धक्काच बसला. याविषयी पुस्तकात खुलासा करताना ती म्हणाली, “संगीत सोहळा संपताच त्याचं रूपांतर अडल्ट स्ट्रिपटीज शोमध्ये झालं, डान्स परफॉर्म करण्यासाठी ज्या मुली आल्या होत्या त्या चित्रविचित्र अंगविक्षेप आणि अश्लील हावभाव करत नाचू लागल्या, बरेच लोक पैसे उडवत होते अन् त्या मुली ते पैसे त्यांच्या ब्लाऊजमध्ये भरून घेण्यात मग्न झाल्या होत्या.”
यानंतर एका व्यक्तीने त्याच्या शॅम्पेन ग्लासमधील शॅम्पेन कुब्राच्या पाठीवर सांडली. याविषयी कुब्रा म्हणाली, “एका वृद्ध गृहस्थाने शॅम्पेन माझ्या पाठीवर सांडणं हे त्यांना फार उत्तेजित करणारं वाटत होतं. मी त्यांच्या हातातून ग्लास घेऊन फोडला अन् त्यांना याबद्दल चांगलीच समजही दिली.” एकूणच मालदीवमध्ये आलेला हा अनुभव कुब्रासाठी बरंच काही शिकवणारा होता हे तिने पुस्तकात सांगितले आहे.