संत वाङ्मय

रवी निंबाळकर

बा तुकोबा

मान अपमान गोवे |
अवघे गुंडूनी ठेवावे ||१||
हें चि देवाचें दर्शन |
सदा राहे समाधान ||२||
शांतीची वसती |
तेथें खुंटे काळगती ||३||
आली ऊर्मी साहे |
तुका म्हणे थोडें आहे ||४||

स्वतः प्रगतीला अडथळा आणणाऱ्या ‘मान-अपमान’ या भ्रामक कल्पनेत आपण विनाकारण अडकून पडतो.
‘त्यानं मला बघितलं पण नमस्कार केला नाही’ किंवा ‘तो मला का अगोदर बोलला नाही?’ असं म्हणून रुसून निघून जाणारे. तसेच अशा क्षुल्लक कारणावरून वाद करणारे अनेक जण आहेत.

एखाद्या कार्यक्रमात आपल्याला मान द्यावा, तिथं आपल्याला सन्मानित करावं, यासाठी काही जण अतिशय केविलवाणी धडपड करीत असतात. आणि जर आपल्या मानपानाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर आपला खूप मोठा अपमान झाला, असं समजून काही जण उगाचच जळफळाट करतात. विनाकारण जिवाचा त्रागा करून घेतात.

याचा त्रास दुसऱ्याला कमी परंतु स्वत:लाच जास्त होत असतो, हेदेखील त्यांच्या लक्षात येत नाही.
कुटुंबात असो वा पै-पाहुण्यांत, मित्र परिवारात असो वा सामाजिक उपक्रमात वावरताना उगाचच ‘अहंकार’ निर्माण करणाऱ्या या असल्या ‘मान-अपमानाच्या’ गोष्टी गुंडाळून ठेवल्या पाहिजेत.

ज्यामुळे मन समाधानी राहते, अंतःकरण शुद्ध राहते आणि अशा त्या कामामुळे इतरांचेही भलं होतं. ते काम करत राहिल्यास साक्षात परमेश्वरच आपल्याला दर्शन देतो.

जर तुमचे मन समाधानी आणि चित्त शांत असेल तर तुमच्या अवतीभवतीसुद्धा परमेश्वर असतो.
त्याला भेटण्यासाठी कुठेही जायची गरज नाही.

एखादा तासन्‌तास देवपूजा करतो, अनेक ठिकाणी जाऊन देव-देव करतो, यात्रा करतो, तीर्थक्षेत्री जातो, मंदिरात देवासमोर उभा राहून डोळे मिटून नमस्कार करतो, पण हे सगळं करत असताना जर त्याच्या मनात अहंकार असेल, इतरांच्याविषयी द्वेष असेल, तिरस्कार असेल, तर त्याला ईश्वर कसा ओ भेटणार?

तो करतो ती निव्वळ नाटकं आहेत. लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी तो केवळ ढोंग करीत आहे.
ज्याच्याकडे संयम आहे. शांतपणे विचार करण्याची क्षमता आहे, अशा त्या व्यक्तीसमोर प्रत्यक्ष ‘काळ’सुद्धा थांबतो.
तुकाराममहाराज म्हणतात, ‘ ज्या व्यक्तीकडे कुठलाही अहंकार नाही, तसेच कुणी अपमान केला म्हणून चिडत नाही. स्तुती आणि निंदा या दोन्ही गोष्टीला अतिशय शांतपणे जो सामोरे जातो, असाच व्यक्ती यशस्वी होतो.’ परमार्थ करण्यासाठी ना कसल्या सोंगा ढोंगांची, ना कसला गाजावाजा करायची गरज आहे. गरज आहे ती फक्त शांत मन अन् समाधनी चित्त असण्याची.

Sumitra nalawade: