अहमदनगर | Sairat Fame Suraj Pawar – सैराट फेम प्रिन्स (Sairat Fame Prince) अर्थात सुरज पवारच्या (Suraj Pawar) अडचणीत वाढ झाली आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी त्याला अटक होण्याची शक्यता आहे. तसंच या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक देखील करण्यात आली आहे. दत्तात्रय क्षिरसागर ( रा. नाशिक ), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे ( दोघेही राहणार संगमनेर ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.
मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी पाच लाख रूपयांची संशयितांकडून मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सुरज पवार याला देखील अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, अटकेतील आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग आहे. या प्रकरणी महेश वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.