आंदोलनातून माघार घेतल्याच्या वृत्तावर साक्षी मलिकनं स्पष्टच सांगितलं; म्हणाली, “न्यायासाठीच्या लढाईत…”

नवी दिल्ली | Sakshee Malikkh – मागील काही दिवसांपासून कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुस्तीगीरांकडून केली जात आहे. तसंच या मागणीवर कुस्तीगीर आंदोलक ठाम आहेत. अशातच आता कुस्तीपटू साक्षी मलिकनं (Sakshee Malikkh) या आंदोलनातून माघार घेतली असल्याचं वृत्त सगळीकडे व्हायरल होत आहे. या वृत्तावर आता साक्षी मलिकनं स्पष्टीकरण दिलं आहे.

दिल्ली भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशाली पोतदार यांनी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये वैशाली पोतदार यांनी म्हटलं आहे की, “कुस्तीपटूंच्या आंदोलनातून साक्षी मलिकनं माघार घेतली आहे. ती पुन्हा रेल्वेच्या कामावर रूजू होणार आहे.” त्यांचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.

वृत्तमाध्यमांनी देखील साक्षीनं आंदोलनातून माघार घेतली असल्याचं वृत्त चालवलं होतं. यावर आता साक्षीनं स्वत: खुलासा करत स्पष्टीकरण दिलं आहे. तिनं म्हटलं आहे की, “हे वृत्त चुकीचं आहे. न्यायासाठीच्या लढाईत आमच्यातील कोणीही मागे हटलं नाही आणि हटणारही नाही. आंदोलनासोबतच मी रेल्वेतील जबाबदारी पार पाडत आहे. तसंच न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहिल. त्यामुळे कृपया हे चुकीचं वृत्त पसरवू नका.”

“आम्ही गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यावेळी ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मी आंदोलनातून माघार घेतली नसून मी रेल्वेच्या कामावर रूजू होणार आहे. आम्हाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. तसंच मुलीनं एफआयआर मागे घेतल्याचं वृत्त चुकीचं आहे”, असंही साक्षी मलिकनं एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

Sumitra nalawade: