मुंबई | बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ईदच्या एक दिवस आधी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यातच आता सलमान खानने त्याच्या चाहत्यांना एक फोटो पोस्ट करत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या फोटोत सलमान खानबरोबर अभिनेता आमिर खान पाहायला मिळत आहे. त्या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. सलमानने चाहत्यांची ही ईद अगदी खास केली आहे. एकीकडे चित्रपट प्रदर्शित झाला आहे तर दुसरीकडे त्याने आमिरसोबतच फोटो शेअर केला आहे.
आमिरने सलमानच्या घरी ईदची दावत खाण्यासाठी हजेरी लावली होती. तेव्हाचा हा फोटो त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांनीही एकाच रंगाचे कपडे घातले आहेत. सलमानने निळ्या रंगाचं शर्ट घातलं आहे तर आमिरने निळ्या रंगाचं टी- शर्ट घातलं आहे. सलमानने २१ एप्रिल रोजी हा फोटो शेअर केला आहे आणि या फोटोवर कॅप्शन देत लिहिलं, ‘चांद मुबारक.’ त्याच्या पोस्टवर चाहतेही त्याला ईदच्या शुभेच्छा देत आहेत. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तर दुसरीकडे त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाला प्रेक्षकांच्या मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. सलमानने देखील शाहरुखप्रमाणे काही वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण केलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.