राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भाजपचं सुरुंग, निवडणुकांच्या तोंडावर मोठा धक्का?

कोल्हापूर : (Samarjit Ghatage On Hasan Mushrif) कोल्हापूर हा शिवसेनाचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, मात्र मागील निवडणुकांत काॅंग्रेस-राष्ट्रवादीने या जिल्ह्यावर ताबा मिळवला. जिल्ह्यातील मागील अनेक वर्षापासून कागल मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात आहे. कारण या मतदारसंघावर माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांचा एकहाती वरचष्मा पहायला मिळाला आहे.

दरम्यान, त्यांच्या याच बालेकिल्ल्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या विश्वासातले नगराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष यांना आपल्या बाजूने वळवून एक प्रकारे सुरुंग लावण्याचे काम केले आहे. कागल शहराच्या नगराध्यक्षा सौ. माणिक माळी व त्यांचे पती कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांच्या गटात प्रवेश केला आहे.

हा पक्षप्रवेश नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने मुश्रीफ गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. कागल शहर हे आमदार हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला आहे. मात्र समरजीत सिंह घाटगे यांनी मुश्रीफांच्या बालेकिल्लाला सुरुंग लावण्याचे काम केले आहे. त्यामुळे येत्या काळात मुश्रीफ आपला किल्ला राखणार का? हे देखील पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Prakash Harale: