नगर : (Sambhaji Kadam On Nitin Gadkari) अहमदनगरचा उड्डाणपूल पूर्णत्वास आल्यानंतर आता त्याचा श्रेयवाद रंगला आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी अलीकडेच पुलाची पहाणी केली. या पुलाचे उद्घाटन १९ नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्याचे जाहीर केले. मात्र यासाठी पाठपुरावा करणारे माजी खासदार दिलीप गांधी आणि माजी आमदार अनिल राठोड यांना योग्य ते श्रेय दिला नसल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला. त्यामुळे आज नियोजित तारखेआधीच शिवसेना तसेच गांधी समर्थकांनी पुलाचे उद्घाटन केल्याचं जाहीर केलं.
नगर शहरातील तयार झालेल्या बहुचर्चित उड्डाणपुलाची शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी पाहणी करुन औपचारिकरित्या नारळ फोडून उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना राज्यसहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक आदिंसह शेकडो शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणाऱ्या सोलापूरातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होत. तर साताऱ्यातही उदयनराजे भोसले यांनी एका पुलाचे उद्धघाटन केलं होतं. आता हाच फाॅर्मुला अहमदनगरच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वापल्याचे दिसून येत आहे.