मुंबई : (Sambhajiraje Chhatrapati On Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असो किंवा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशी वक्तव्य केली जात असताना मी तरी किती बोलायचं. समाज हे सर्व बघत आहे. यांनी केलेली वक्तव्य खरी असतील तर त्यांनी समोर येऊन ते खरं कसं आहे ते सांगावं. तसंच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी याची उत्तरे द्यावेत, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
राहुल गांधीनी सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा वाद शमतो न शमतो, तोच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे हिरो असून, डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राज्यपाल यांच्या विधानावरून राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, संभाजी ब्रिगेडसह संभाजीराजे यांच्याकडून निषेध करण्यात आला असून, त्यांच्यावर टीका देखील करण्यात येत आहे.
राज्यपाल यांच्या वक्तव्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, ‘शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली’ असं त्यांनी म्हटलं त्यामुळे हा वाद आता आणखीनच तीव्र होताना दिसत आहे.