मुंबई : (Sandeep Deshpande On Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह शिवसेना पक्षाविरोधी बंडखोरी करत आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर सध्या तोंडावर आलेल्या दसरा मेळाव्यावर देखील शिंदे गट दावा करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक अतूट नातं आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेची ओळख आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या परंपरेची 55 वर्षापुर्वी सुरुवात केली होती. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दरवर्षी दसरा मेळाव्यात संबोधित करत असतात.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मेळावा हा आमचाच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. पालिकेची परवानगी मिळेल किंवा नाही पण, शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क इथचं होणार आणि तोही खऱ्या शिवसेनेचाच होणार असल्याचे त्यांनी शिंदे गटाला ठणकावून सांगितलं. शिवसेना-शिंदे गटात मेळाव्यासाठी रस्सीखेच सुरू असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादावर भाष्य करत मेळावा घेण्याची तयारी दर्शवली आहे.
मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत शिवसेना आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे. ‘शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे. आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे “वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो” असे ट्वीट देशपांडे यांनी केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, वारसा हा वास्तूंचा नसतो तर विचारांचा असतो असे सांगत बाळासाहेबांचे विचार आपल्यासोबत असल्याचे राज यांनी सांगितल्याचे देशपांडे म्हणाले. त्यामुळे मनसे देखील दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.