मुंबई : जवळपास तीन आठवड्यांपासून ‘नॉट रीचेबल’ असणारे मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र, न्यायालयानं काही अटी घालून दिल्या आहेत. त्यामध्ये पोलीस स्थानकात हजेरी लावण्याची अट समाविष्ट आहे. चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत हजेरी लावण्याची अट लागू असण्याची शक्यता आहे. जर या अटीचं उल्लंघन झालं, तर जामीन रद्द करण्यासाठी पोलीस पुन्हा अर्ज करू शकतात, असं देखील प्रदीप घरत यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासोबतच न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या संतोष साळवी आणि देशपांडे यांच्या गाडी चालकाला देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. देशपांडे आणि धुरी यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ३५३ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून हे दोघे नॉट रीचेबल होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात केला होता. गेल्या १५ दिवसांपासून शिवाजी पार्क पोलीस आणि गुन्हे शाखेची टीम त्यांच्या शोधात होती. मात्र, आता या दोघांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आता तरी हे दोघे समोर येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.