मुंबई | Sandeep Deshpande – मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संदीप देशपांडे हे मुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे मॉर्निंग वॉकला आले असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात आरोपींनी त्यांना स्टम्पच्या साहाय्यानं मारहाण केली. या हल्ल्यानंतर देशपांडेंना तातडीनं हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच त्यांना प्राथमिक उपचारानंतर आरामासाठी घरी सोडण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांनी या हल्ल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी संदीप देशपांडे म्हणाले की, “आम्ही कुणालाही घाबरत नाही किंवा घाबरणार नाही. आम्हाला असा घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. कुणालाही आम्ही भीक घालत नाही. या हल्ल्यामागे जे कोण लोक आहेत ते सर्वांना माहिती आहे.”
“मी अशा हल्ल्यांना घाबरणार नाही. माझं काम मी करत राहील. ज्यांना वाटतं या हल्ल्यानं मी घाबरेल त्यांना मी स्पष्टपणे सांगतो की, यानं मी घाबरणार नाही,” असंही संदीप देशपांडेंनी स्पष्ट केलं.
दरम्यान, आज (3 मार्च) सकाळी शिवाजी पार्कमध्ये संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी एक टोळक्यानं संदीप देशपांडेंवर स्टम्पच्या साहाय्यानं हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडेंच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे.