सांगली : पतीने रजेसाठी रितसर अर्ज देऊनही तो नाकारल्याने सांगली जिल्हयातील आटपाडी येथील एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने आगार प्रमुखाच्या दालनासमोर झोपून आंदोलन सुरू केले. या अनोख्या आंदोलनाची चर्चा आटपाडी परिसरात रंगली आहे.
विलास कदम हे गेल्या ३३ वर्षांपासून एसटीत चालक म्हणून सेवा बजावत आहेत. ७० दिवसांनी ते सेवानिवृत्त होणार आहेत. आजअखेर त्यांची २७० दिवस रजा शिल्लक आहे. आजारी पत्नीला बाहेरगावी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी १२ मार्च व १३ मार्च अशा दोन दिवसाच्या रजेसाठी त्यांनी आगार प्रमुखांकडे ६ मार्च रोजी अर्ज केला होता. मात्र एसटी प्रशासनाने त्यांना सुट्टी नाकारत त्यादिवशी आटपाडी-इचलकरंजी ही ड्युटी असल्याचे कारण दिले.
रविवारी सकाळी चालक कदम यांची पत्नी नलिनी कदम आटपाडी आगारामध्ये आल्या. आणि आटपाडी एसटी आगारात त्यांनी पतीच्या रजेसाठी अधिकाऱ्याच्या दालनासमोर झोपून अनोखे आंदोलन केले. केबिनसमोर अंथरून पांघरून टाकत आंदोलन सुरू केले. दरम्यान चालक कदम हे त्यांना दिलेली आटपाडी इचलकरंजी गाडी घेऊन सेवेवर गेले.