मुंबई : (Sanjay Gaikwad On Bhagat Singh Koshyari) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल दुसऱ्यांदा वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे शिंदे गट नाराज असल्याची शक्यता आहे. शिंदे गटातल्या एका आमदाराने यासंबंधी जाहीर भूमिका मांडली आहे.
एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कोश्यारी यांच्याविरोधात जाहीरपणे भूमिका घेतली आहे. त्यांना कुठेतरी बाहेर पाठवा, अशी मागणी त्यांनी केलीय. ”राज्यपालांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, शिवाजी महाराजांचे विचार कधी जुने होणारे नाहीत. शिवाय त्यांची तुलना जगातल्या कोणत्याही महान व्यक्तीशी होऊ शकत नाही.
केंद्रातल्या भाजप नेत्यांनी अशा राज्याचा इतिहास माहिती नसलेल्या व्यक्तीला राज्याच्या बाहेर कुठंही पाठवावं.” अशी मागणीच बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे कोश्यारी प्रकरणावरुन शिंदे गट नाराज असल्याचं दिसून येत आहे.