मुंबई : (Sanjay Gaikwad On Dr. Rajendra Shingane) राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप होऊ शकलेला नाही. मात्र विस्तार होण्याआधीच अनेक आमदार मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र संभाव्य मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आक्रमक झाले आहे. बुलढाणा जिल्ह्याचा पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ देणार नसल्याचा त्यांनी थेट इशाराच दिला आहे. त्यामुळे घर बसायच्या आधीच युतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं. त्यामुळे बुलढाण्याच्या पालकमंत्री पदावरून युतीमध्ये नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या उठावात सहभागी होताना जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर आरोप केले होते. पालकमंत्री निधी वाटपात दुजाभाव करीत असल्याचा आरोप त्यावेळी गायकवाडांनी केला होता.
दरम्यान, पुढील मंत्रीमंडळ विस्तारात “डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मंत्रिपद मिळाले आणि त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले तर तुम्हाला ते मान्य असेल का?” असा प्रश्न शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना विचारण्यात आला. यावर गायकवाड म्हणाले की, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्री होऊ देणार नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे २ आणि भाजपचे ३ आमदार आहेत. एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजप किंवा शिवसेनेचा पालकमंत्री होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.