“दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला द्या, असं…” राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई | Sanjay Raut – सध्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. यापार्श्वभूमीवर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि आपवर गंभीर आरोप केले आहेत. ‘दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा’, असं भाजप आणि आपमध्ये साटंलोटं झाल्याची शंका संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे. ते गुरुवारी (8 डिसेंबर) मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

“तीन महत्त्वाच्या निवडणुका झाल्या. दिल्ली महानगरपालिकेतील 15 वर्षांची सत्ता बुधवारी (7 डिसेंबर) आपने खेचून घेतली. बसपा आणि एमआयएमकडून मतविभागणं झाली नसती, तर आपला चांगलं यश मिळालं असतं. तरीही देशाच्या राजधानी दिल्लीत आपला जे यश मिळालं ते कौतुकास्पद आहे. दिल्लीत 15 वर्षांची सत्ता भाजपकडून खेचून घेणं सोपं काम नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “गुजरातचा दुसरा निकाल अपेक्षित आहे. तिकडेही आप आणि काही अन्य पक्षांनी एकत्र येऊन काही आघाडी केली असती किंवा एकमेकांना समजून घेतलं असतं तर नक्कीच भाजपला ‘काटे की टक्कर’ द्यावी लागली असती. मात्र, दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा असं काही तरी झालं असावं अशी लोकांना शंका आहे,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Sumitra nalawade: