मुंबई : Sanjay Raut Arrest – गोरेगाव येथील पञाचाळ प्रकरणी ईडीच्या पथकानी रविवार दि. 31 जुलै रोजी सकाळी 7 वाजताच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या राहत्या घरावर छापेमारी केली. तब्बल नऊ तासाच्या तपास प्रक्रियेनंतर संजय राऊतांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आले. मात्र, रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले आहे.
मागील महिनाभर एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाच्या बातम्या रंगत असताना, दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले, तर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही”, असे मराठी अस्मितेला डिवचवणारे वादग्रस्त विधान केले. सर्व राजकारण्यांचे लक्ष तिकडे लागलेले असताना, अचानक राऊतांच्या घरी ईडीचे धाडसञ सुरू झाले. त्यात त्याच राञी मुख्यमंञी एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंञी अमित शहा यांच्यातील गुप्त भेटीची माहिती माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, आज संजय राऊत यांना तपासणी करून दुपारी 3:30 वाजता विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयासमोर ईडीकडून राऊतांच्या चौकशीसाठी कोठडी मागण्यात येणार आहे. तर राऊत यांचे वकील बेल मिळावी म्हणून प्रयत्न करणार आहेत. दोन्ही बाजूचा जोरदार युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालय आपला निकाल देईल. हा निकाल महत्त्वाचा असून राऊतांना जेल होणार की बेल मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.