मुंबई : राणा दाम्पत्य महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक निर्माण करून सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर पोलिसांकडून लावण्यात आलेले राजद्रोहाचे कलम योग्यच असल्याचं मत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हा न्यायालयाचा निर्णय असून सरकारचा नव्हे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. प्रत्येक कारवाई ही कायद्यानेच होते.
तसेच भाजपला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे संघर्ष निर्माण करून दंगलसदृश परिस्थिती निर्माण करायची आहे. मग राज्यपाल त्यांचेच आहेत. त्यांच्यामार्फत शिफारस करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याचा आरोपही राऊतांनी यावेळेस लगावला आहे.
दरम्यान राणा दाम्पत्य म्हणजे काय टॉलस्टॉय आणि त्याची बायको नव्हेत. आता ते तुरुंगात बसून हनुमान चालीसा वाचू शकतात. राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा वाचण्याची इतकी हौस होती तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जावे, कोर्टात जावे किंवा एखादे सभागृह घेऊन हनुमान चालिसा वाचावी, अशी खरपूस टीका करायलाही राऊत यावेळस विसरले नाहीत.