मुंबई | Sanjay Raut On Ajit Pawar – काल (18 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत त्यांची स्पष्ट भूमिका मांडत या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. यावेळी बोलताना पवारांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) त्यांचं नाव न घेता खडसावलं होतं. कुणीही आमची वकिली करायची गरज नाही. आमच्या पक्षाबाबत जे काही सांगायचं आहे ते आम्ही सांगू. इतरांनी यात पडू नये, असं म्हणत अजित पवारांनी संजय राऊतांना सुनावलं होतं. त्यावर आता संजय राऊतांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, “मी नेहमी म्हणतो की, महाविकास आघाडी ही तीन पक्षांची असून आम्ही तिचे चौकीदार आहोत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न होतो तेव्हा आम्ही एकत्र सगळे असतो. शिवसेना जेव्हा फुटत होती तेव्हा शरद पवार, अजित पवार आणि नाना पटोले यांनी चिंता व्यक्त केली होती. त्याप्रमाणेच आम्हीही चिंता व्यक्त केली.”
“माझ्यावर महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून खापर का फोडलं जातंय? महाविकास आघाडीबाबत मी काय चुकीचं बोललो आहे? जेव्हा शिवसेना फुटत होती तेव्ही तुम्ही आमची वकिली करत होतात. तसंच आपल्या सोबतचा घटकपक्ष मजबूत राहावा, ही आमची कायम भूमिका असेल. कुणी याबाबत जर आमच्यावर खापर फोडत असेल तर गंमतच आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “मी जे रविवारी रोखठोक लिहिलं त्यामुळे भाजपचं ऑपरेशन लोटस बॅकफूटवर गेलं. महाराष्ट्र, बिहार आणि बंगाल या ठिकाणी हेच चाललं आहे. या षडयंत्राला लढण्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत. जर मी खोटं बोलतो असं वाटत असेल म्हणून मला कुणी टार्गेट करत असेल तरीही मी खरं बोलत राहणार. कारण मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मला जे बोलायचं ते मी बोलत राहणार”, असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांना सुनावलं.