मुंबई : (Sanjay Raut On Devendra Fadnavis) मागील तीन महिने कथित पत्राचाळ आर्थिक गैरव्यहार प्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे बुधवारी दि. 09 रोजी सायंकाळी जामिनावर बाहेर आले आहेत. संजय राऊत हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर तुटून पडतील असं वाटतं होतं. मात्र, राऊत यांनी पहिल्या दिवशी तरी सरकारवर हल्लाबोल करणं टाळलं आहे. याउलट त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षात केल्याचे दिसून येत आहे. आपण फडणवीसांना भेटणार असल्याचे देखील राऊत म्हणाले, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान फडणवीसांना यावर विचारलं असतं ते म्हणाले की, मी संजय राऊत हे काय बोलले, ते ऐकलं नाही. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
तर राऊत म्हणाले, महाराष्ट्रात एक नवीन सरकार स्थापन झालं आहे. मी मागील तीन महिन्यांपासून बाहेर होतो. या सरकारने काही चांगले निर्णयही घेतले आहेत. मी त्यांचं स्वागतही करतो. फक्त विरोधासाठी विरोध आम्ही कधी करणार नाही. ज्या गोष्टी राज्यासाठी, देशासाठी आणि इथल्या लोकांसाठी चांगल्या असतात त्यांचं नेहमी स्वागतच केलं पाहिजे.