“जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला…”, सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर राऊतांचं ‘ते’ ट्विट चर्चेत

मुंबई | Sanjay Raut – भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तसंच किरीट सोमय्यांवर अनेक नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. यामध्ये ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सोमय्यांवर हल्लाबोल केला होता. तर आता त्यांच्यापाठोपाठ खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही सोमय्या यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी किरीट सोमय्या यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. “आमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे, जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका. आता नेमकं तसंच घडत आहे. यापुढे देखील बरंच काही घडणार आहे. जे जे होईल ते पाहत राहावं”, असं संजय राऊत यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणानंतर किरीट सोमय्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. सोमय्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही. मी देवेंद्र फडणवीस यांना अशा आरोपांची व्हिडीओची सत्यता तपासावी आणि चौकशी करावी अशी विनंती केली आहे. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.” त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करावी अशी विनंती त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांना केली आहे.

admin: