मुंबई | Sanjay Raut – सध्या ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यापासून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. तसंच आज (7 मार्च) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल करत त्यांना थेट आव्हान दिलं आहे.
काल (6 मार्च) संध्याकाळी ठाण्यातील शिवाई नगर येथील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापसांत भिडले. शिवाई नगर शिवसेना शाखा शिंदे गटानं कुलूप तोडून ताब्यात घेतली. त्यानंतर ठाकरे गटानं विरोध करत घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
“ही शाखा आमची आहे. प्रताप सरनाईक यांनी ही शाखा बांधली आहे. ठाकरे गटानं चुकीच्या पद्धतीनं शाखेला कुलूप लावलं होतं”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली आहे.
या प्रकारावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ज्याप्रकारे सत्तेचा वापर करून जे काही ओरबाडून नेलं जात आहे, ते सगळं आम्ही परत मिळवू. हे फक्त काही दिवसांसाठीच आहे. त्यामुळे ना ही सत्ता राहील, ना ही दादागिरी राहील. आमच्या लोकांविरोधात पोलीस सत्तेचा वापर करत आहेत. याचा अर्थ असा होतो की तुम्ही लोक घाबरला आहात. तुम्ही जर मर्द असाल तर समोर येऊन आमच्याशी लढा. बघून घेऊ”, असं आव्हान संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिलं आहे.
“हे प्रकार ठाण्यातच चालले आहेत. ठाण्यातच या गटाचं अस्तित्व आहे. हे स्वत:ला शिवसैनिक म्हणवणाऱ्यांचं काम नाही. तुम्ही मर्द असाल तर समोर या. पोलिसांच्या आडून हल्ले करू नका. खेडच्या सभेनंतर सगळ्यांच्या पायाखालच्या जमिनी सरकल्या आहेत. कसब्यातला विजय, चिंचवड – भाजपचा विजय नाही. हे सगळं पाहिल्यावर भाजप किंवा मिंधे गट दुसरं काय करणार? पण आमचा शिवसैनिक मागे हटणार नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.