मुंबई | पक्षाविरोधात बंड पुकारत एकनाथ शिंदे सत्तेच्या गादीवर विराजमान झाले. त्यामुळे राज्यातील राजकारणाला नवं वळण मिळालं आहे. अशातच नेहमी ट्विट करत विरोधकांवर टीकास्त्र सोडणारे संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या विम्बल्डन गर्लचे कौतुक करत राजकारण रोजचंच आहे… त्या पलीकडे देखील जग आहे… असं म्हटलं आहे. राजकारण सोडून राऊतांनी ट्विट केल्यामुळे त्यांचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे.
एशियन टेनिस फेडरेशनतर्फे इंग्लड येथे होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठी कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिची आशियाई संघात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी निवड झालेली ऐश्वर्या जाधव ही देशातील एकमेव खेळाडू आहे. दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड ज्युनिअर टेनिस स्पर्धेतून या संघाची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये 14 वर्षांखालील गटात दोन मुले आणि दोन मुलींची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, ऐश्वर्या ही कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनची खेळाडू आहे. छत्रपती शाहू विद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. तिला प्रशिक्षक अर्षद देसाई, मनाल देसाई आदींचे मार्गदर्शन आहे. विम्बल्डन स्पर्धेसाठी भारताच्या ऐश्वर्या जाधवसह अझुना इचीओका-जपान, झांगर नुरलानुल-कझाकिस्तान, सी हॅयुक चो-कोरीया यांचा समावेश करण्यात आला होता.