मुंबई | Sanjay Raut – भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) जन्म महाराष्ट्रात झाला होता, असं म्हटलं आहे. यावरून चित्र वाघ यांनी राऊतांवर टीका केली. यानंतर संजय राऊतांनीही चित्रा वाघ यांच्या टीकेला खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी चित्रा वाघ यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे की, “रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचं दर्शन आज महाराष्ट्राला झालं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, मध्य प्रदेशमधील महू येथे झाला आहे. इतकं सामान्य ज्ञान असू नये? आमचे आदर्श असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवताय?”
पुढे त्यांनी संजय राऊतांच्या विधानाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. “लो कर लो बात…सर्वज्ञानी संजय राऊत म्हणत आहेत, बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. अहो…महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे. तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान”, असा टोला चित्रा वाघ यांनी राऊतांना लगावला आहे. यावर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आज (16 डिसेंबर) सकाळी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. “भाजपच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे मेंदू आहेत असं मला दुर्दैवानं म्हणावं लागतंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का? त्या नात्यानं आम्ही म्हटलं की ते आमचे आहेत. भारतातच त्यांचा जन्म झालाय. 1891 साली आंबेडकरांचा जन्म आत्ताच्या मध्य प्रदेशात झालाय. तेव्हा मध्य प्रदेश नव्हतं. फक्त एकच मुंबई प्रांत होता. भाषिक राज्य कधी निर्माण झाली, याचा अभ्यास करावा. त्यांना कळतं का? अभ्यास त्यांनी करायचाय”, असं संजय राऊत म्हणाले.
“जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, तेव्हा देशात कोणतंही राज्य नव्हतं. आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत हे जर त्यांना माहीत नसेल, कळत नसेल तर अजूनही त्यांच्या आंबेडकरांविषयी काय भावना आहेत, हे स्पष्ट होतंय. भाजपमध्ये काय लायकीचे आणि बुद्धीचे लोक बाहेरून घेतलेत ते कळतंय. त्यांच्या जिभेवर काय, डोक्यात काय, पोटात काय? वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर, फुलेंचा अपमान करतायत आणि आम्हाला शिकवत आहेत”, अशा शब्दांत संजय राऊतांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली.
View Comments (0)