संजय राऊतांचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान; म्हणाले, “सोलापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल तर…”

मुंबई | Sanjay Raut – कर्नाटक सरकारकडून जतमध्ये धरणाचं अतिरिक्त पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी अनेक घोषणाही केल्या आहेत. सीमेपलीकडील जनता आपलीच आहे. तेथील कन्नड शाळांना निधी दिला जात नाही. मुलभूत सुविधा देखील मिळत नाहीत. या शाळांना कन्नड रक्षण प्राधिकरणाच्या माध्यमातून निधी दिला जाईल. सोलापुरात कन्नड भवन बांधण्यासाठी 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत, असं बोम्मई यांनी शुक्रवारी (2 डिसेंबर) पत्रकार परिषदेत म्हटलं. याला आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“हा देश अनेक राज्य एकत्र येऊन बनला आहे. आता देशात संस्थाने राहिली नसून राज्य आहेत. महाराष्ट्राचे प्रत्येक राज्यांबरोबर आणि कर्नाटकशीही प्रेमाचे संबंध आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुवाहाटीवरून आल्यानंतर मुंबईत आसाम भवन उभारण्याची घोषणा केली. तर, मुख्यमंत्री बोम्मई यांनी सोलापुरात कर्नाटक भवन उभं करणार असल्याचं सांगितलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “मुंबईत अनेक कानडी बांधवांचं भवन, हॉल्स आहेत. कर्नाटकशी आमचा वाद नाही. ते वाद निर्माण करत आहेत. जर इर्षेने सोलापूर आणि कोल्हापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल तर बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यावी. आमची बेळगाव आणि बेंगलोरला महाराष्ट्र भवन बांधण्याची इच्छा आहे. त्याबाबत निर्णय व्हावा,” असं आव्हान संजय राऊतांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना दिलं आहे.

Sumitra nalawade:

View Comments (0)