“बोम्मई महाराष्ट्राच्या कानफाडात मारतात अन् मुख्यमंत्री गाल चोळत…”, संजय राऊतांचं राज्य सरकारवर टीकास्त्र

मुंबई | Sanjay Raut On Eknath Shinde – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून (Maharashtra-Karnataka Border Dispute) राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच हा वाद विकोपाला गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मध्यस्थी करून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, त्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या कुरापती काढणं सुरूच ठेवलं आहे. त्यामुळे राज्यातील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, “त्यांनी तीन महिन्यांपूर्वी जी क्रांती महाराष्ट्रात केली त्या क्रांतीचाच एक भाग कर्नाटकात दिसतोय. बोम्मई काय म्हणत आहेत त्यापेक्षा महाराष्ट्र काय म्हणतोय हे महत्त्वाचं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बोटचेपी भूमिका घेतायत. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी केली म्हणजे नेमकं काय केलं? जैसे थे परिस्थिती म्हणजे काय? कर्नाटकचे मुख्यमंत्री जे बोलत आहेत त्यावर तुम्ही काही भूमिका मांडणार आहेत की नाही?” असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.

“कर्नाटकचे मुख्यमंत्री (Basavraj Bommai) म्हणतात की, एक इंचही जमीन देणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जागांवरचा हक्क सोडणार नाही. महाराष्ट्राची इतकी बेअब्रू गेल्या 70 वर्षांत कधीही बाजूच्या राज्यांनी केली नव्हती. जरी सीमाप्रश्न जुना असला, तरी एकमेकांच्या राज्याविषयी आदर ठेवून हा संघर्ष सुरू होता. दोन्ही राज्य एकाच देशाचे घटक आहेत. तरी बोम्मई यांची भाषा अशी आहे. दोन्हीकडे भाजपचे नेते आहेत. तरी रोज उठून बोम्मई महाराष्ट्राच्या कानफडात मारतात आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्र सोडलं.

पुढे ते म्हणाले, “तुम्ही दिल्लीत गेला होता तेव्हा गृहमंत्र्यांनी तुम्हाला गुंगीचं इंजेक्शन टोचलंय का? काही बोलायचं नाही असं सांगितलं आहे का? तसं असेल तर स्पष्ट सांगा. यावर लाखोंचा मोर्चा महाराष्ट्रात निघाला आहे. लोकांच्या भावना तीव्र आहेत. हे जर राज्याच्या राज्यकर्त्यांना कळत नसेल तर कठीण आहे. तुम्ही ग्रामपंचायतींचे निकाल सांगताय, पण गावं बाहेर चाललीयेत ते बघा. इतकं विकलांग, हतबल राज्य कधीच झालं नव्हतं”, असंही राऊत म्हणाले.

“महाराष्ट्राचं सरकार जशास तसं उत्तर देण्याची गरज असताना याबाबत लेचीपेची भूमिका घेतंय. हे कुणालातरी घाबरतायत असं वाटतंय. तुम्हाला कुणाची भीती वाटतेय याबाबत तुम्ही निर्णय घेतला तर महाराष्ट्र आपल्या पाठिशी उभा राहील. इथे राजकारण नाही. कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरी सीमाप्रश्नावर आम्ही एक आहोत. राज्यातला प्रत्येक राजकीय नेता तुमच्या पाठिशी उभा राहील. पण, तुम्ही भूमिकाच घेत नाहीत याला काय म्हणावं”, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Sumitra nalawade:

View Comments (0)