‘करारा जवाब मिलेगा’, मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा संतप्त इशारा

मुंबई | Sanjay Raut – काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही संताप व्यक्त केला आहे. यादरम्यान, काल (30 नोव्हेंबर) सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी खळबजनक वक्तव्य केलं आहे. लोढा यांनी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत केलेल्या बंडाची तुलना थेट शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं असून यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

“राज्य सरकारमधील काही लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची स्पर्धा लागली आहे. यामध्ये राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा देखील समावेश आहे. हे होत असताना महाराष्ट्रातील जनता डोळे बंद करून गप्प बसणार नाही. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना लवकरच ‘करारा जवाब मिलेगा'”, असा संतप्त इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ते आज (1 डिसेंबर) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुढे ते म्हणाले, “मंगलप्रभात लोढा हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत. मुंबईचे पालकमंत्री आहेत, पर्यटनमंत्री आहेत. निदान राज्याच्या पर्यटन मंत्र्याला तरी या राज्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित असला पाहिजे. महाराष्ट्रात जगभरातून पर्यटक येत असतात. हे पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहायला येतात, त्यांचे किल्ले पाहायला येतात. अशा स्थितीत महाराष्ट्राचे मंत्री छत्रपती शिवराय यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य करुन त्यांची तुलना एका पक्षाशी, राज्याशी बेईमानी करणाऱ्या व्यक्तिशी करत आहेत”, असा खोचक टोला राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

“छत्रपती शिवाजी महाराजांना भाजपच्या प्रवक्त्यानं माफिवीर ठरवलं, राज्यपालांनी छत्रपती शिवरायांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं, आता राज्यातील एका मंत्र्यानं छत्रपती शिवरायांची तुलना करुन महाराष्ट्राचा अपमान केला आहे. सध्याच्या या खोके सरकारमध्ये कोण छत्रपती शिवरायांचा जास्त अपमान करेल अशी स्पर्धा लागली आहे. त्यांच्यावर दिल्लीनं मोठं बक्षीस लावलंय का? असा सवाल राऊतांनी केला. रोज भाजपचा एक माणूस छत्रपतींचा अपमान करत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे 40 खोके आमदार गप्प आहेत. छत्रपतींचा अपमान हा हिंदुत्वाचा अपमान नाही का? असा सवालही राऊतांनी शिंदे सरकारला केला आहे. छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? छत्रपतींच्या आग्रा सुटकेची तुलना तुम्ही एका बेईमान व्यक्तिशी करत असाल तर तुम्हाला लवकरच उत्तर मिळेल”, असंही राऊत म्हणाले.

Sumitra nalawade: