मुंबई | Sanjay Raut – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही संजय राऊतांनी त्यांना एका व्यक्तीनं धमकी दिल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना धमकी देण्यात आली आहे. ही धमकी लाॅरेन्स बिष्णोई गँगच्या नावानं देण्यात आली आहे. या संदर्भात आता खुद्द संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते आज (1 एप्रिल) सकाळी माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊतांना काल (31 मार्च) संध्याकाळी पाचच्या सुमारास धमकी आल्याचा प्रकार घडला आहे. संजय राऊतांच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत आल्यानंतर AK47 रायफलनं गोळ्या घालण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे. धमकी आल्यानंतर राऊतांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. ही धमकी लाॅरेन्स बिष्णोई गँगच्या नावानं देण्यात आल्याचं मोबाईलवर आलेल्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, यासंदर्भात संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. “धमक्या या येत असतात. पण सध्याचं सरकार विरोधकांना आलेल्या धमक्या गांभीर्यानं घेत नाही. सगळी सुरक्षा व्यवस्था ही गद्दार गटाचे आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांसाठी लावल्यामुळे महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था ढेपाळली आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
“आपण मुंबईसह महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली, महिलांवर होणारे अत्याचार अशा गोष्टी पाहत आहोत. तसंच पोलीस अधिकारी वैभव कदम यांनी केलेली आत्महत्या असे प्रकार दररोज घडत आहेत. तरीही राज्याच्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना त्याकडे पाहायला वेळ नाही. जेव्हा आम्हाला धमक्या येतात तेव्हा त्याची माहिती आम्ही देतो, पण तेव्हा गृहमंत्री त्याची चेष्टा करतात की हा स्टंट आहे”, असं म्हणत संजय राऊतांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पुढे राऊतांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, “मला माहिती आहे की सलमान खानला ज्यांनी धमकी दिली, त्याच गँगच्या माध्यमातून मलाही धमकी देण्यात आली आहे. त्यातल्या काहींना पकडलं असल्याचं मला समजलंय. जर असं झालं असेल, तर त्यासाठी मी पोलिसांचा आभारी आहे.”