मुंबई | Sanjay Raut – संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली होती. मराठा मोर्चाचा व्हिडीओ (Maratha Morcha Video) ट्विट केल्याचा आरोप करत संभाजीराजेंनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं. यावर आता राऊतांनी संभाजीराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते आज (19 डिसेंबर) मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत म्हणाले, “संभाजीराजे छत्रपती यांनी माझ्यावर टीका केली. संभाजीराजे एक प्रगल्भ नेते आहेत. आमचा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा आहे. हे भाजपच्या (BJP) नादाला कुठे लागले आहेत आणि मोर्चा-मोर्चा, आमचा मोर्चा मोठा की तुमचा मोर्चा मोठा असं कुठे म्हणत आहेत. सगळे मोर्चे आपलेच आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा मुद्दा घेऊन उभे आहोत. मग आपण सगळे त्यावरच बोलुयात. इतकच मी छत्रपतींना आवाहन करतो.”
ट्विट केलेल्या व्हिडीओवर संजय राऊत म्हणाले, “मराठा समाजाचा मोर्चा हा आमचा नव्हता का? मी तो व्हिडीओ महाविकासआघाडीचा असल्याचं कुठंच म्हटलेलं नाही. ते ट्विट तुम्ही काळजीपूर्वक पाहा. त्यामध्ये मी कुठेही दावा केलेला नाही की, हा महाविकासआघाडीचा मोर्चा आहे. हे लोक मराठा मोर्चालाही नॅनो मोर्चा म्हणत होते. मात्र, तो मोर्चाही प्रचंड मोठा होता.”
“महाविकासआघाडीचा मोर्चा आणि मराठा मोर्चा दोन्ही ताकदीचे होते. दोन्ही मोर्चे न्यायहक्कासाठी होते. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दोन्ही मोर्चे निघाले होते. मराठा मोर्चात सहभागी झालेले अनेकजण मविआच्या मोर्चातही होते. त्यावर भाजपला इतकं कळवळून टीका करण्याचं कारण नाही. असे विराट मोर्चे निघाले की त्यांना नॅनो मोर्चे म्हणायचं अशी भाजपची प्रथा आहे. त्यावरच मी टीका केली आहे,” असंही संजय राऊत म्हणाले.