मुंबई | Sanjay Shirsat – सध्या राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपसोबत (BJP) गेल्यानंतर राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. या दरम्यान शिंदे गट मंत्रीपदावरून नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसंच शिंदे गटात मंत्रीपदावरून दोन आमदार भिडल्याची देखील माहिती समोर येत आहे. तर फक्त शिंदे गटच नाही तर भाजपमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे.
संजय शिरसाट यांनी सांगितलं की, “सत्तेची पदं गेल्यानंतर काही आमदारांमध्ये नाराजी असणं साहजिकच आहे. पण याला तुम्ही नाराजी किंवा बंडखोरी म्हणू शकत नाही. तसंत हा प्रकार फक्त एकट्या शिंदे गटातच झाला आहे आणि भाजपमध्ये झाला नाही असं नाहीये.”
“भाजपचे देखील 105 आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्येही थोडीफार नाराजी आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना चिंता करू नका असं सांगितलं आहे. तसंच योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे”, असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं.