अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली
सोमनाथ साळुंके | भाग क्र. २ |
येरवडा : समाजातील गोरगरीब जनतेचे हक्काचे स्थान म्हणून ज्या ससून रुग्णालयाकडे पाहिले जाते. त्याच ससून रुग्णालयातील भिंती या गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्याने ससून रुग्णालय हे गुटख्याचा अड्डा बनल्याने या भागातील रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
ससून रुग्णालयात राजरोसपणे समाजातील गोरगरीब कुटुंबातील शहरासह, उपनगर व ग्रामीण भागातील रुग्ण हे उपचारासाठी येत असतात.त्यातच राज्यातील अनेक अल्पवयीन मुलांसह तरुणवर्ग देखील व्यसनाच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाल्याने तरुणांना व्यसनमुक्तीतून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून जनजागृती केली जाते. त्यातच पालिका आरोग्य विभागाकडूनही ‘स्वच्छ पुणे सुंदर पुणे’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असताना आरोग्याच्या विभागाला खऱ्या अर्थाने ससून रुग्णालयात आल्यावर पायमल्ली होत असल्याचे चित्र पहायला मिळते.
ससून रुग्णालयात कॅन्सर, दमा, फुप्फुसाचे आजार असणारे रुग्ण हे उपचारासाठी रुग्णालयात येत असतात. मात्र या ठिकाणी असणाऱ्या भिंती गुटख्यांच्या पिचकाऱ्यांनी रंगल्याने असणारे रुग्णालय शासकीय रुग्णालय आहे का प्रश्न पडत आहे. कारण भिंती गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी एवढ्या प्रमाणात रंगल्या आहेत, की तेथील भिंतींना रंग देण्याचीही गरज भासणार नाही. विशेष म्हणजे रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णासह नातेवाइकांना आतमध्ये प्रवेश करताना त्यांचे खिसे तपासून त्यांना प्रवेश दिला जातो.
एखाद्या व्यक्तीकडे तंबाखूजन्य पदार्थ असेल, तर ते जप्त केल्यानंतरच आत सोडले जाते. मात्र सध्या तरी असणाऱ्या नियमांची नागरिकांसह कर्मचाऱ्यांकडून पायमल्ली होत असल्यामुळेच अशा प्रकारे गुटख्यांनी भिंती रंगल्याचे दिसून येत आहे. ससून रुग्णालय अधीक्षकांनी रुग्णालयात तंबाखूजन्य वस्तू आणण्यास सक्त मनाई केली आहे. तसे फलकही लावण्यात आले आहेत. तरी पण नागरिकांसह कर्मचाऱ्याकडूनच अधीक्षकांच्या नियमांची पायमल्ली केली जात असेल, तर अधीक्षक काय करतात हा प्रश्न आहे. अधीक्षक अथवा डॉक्टर हे रुग्णांची तपासणी करण्यासाठी येत असतात. पण त्यांना ही अशा प्रकारची झालेली दुरवस्था दिसत नाही का, असा सवाल करण्यात येत आहे.
अनेक कर्मचारी अथवा नागरिक हे सकाळ अथवा रात्रीच्या सुमारास आडोशाचा गैरफायदा घेत रुग्णालयाच्या आवारातच सर्रासपणे दारू पिण्याचा आनंद लुटत असल्यामुळे गुटख्यापाठोपाठ हे रुग्णालय तळीरामांचा अड्डाच बनला आहे.