उपग्रह सौर ऊर्जा गोळा करून पृथ्वीवर पाठवणार
लंडन : भविष्यात अंतराळातून सौर ऊर्जा गोळा करून मायक्रोवेव्हद्वारे पृथ्वीला वीज पुरवण्याचा एक विलक्षण प्रयोग प्रत्यक्षात येऊ शकतो. ब्रिटनच्या स्पेस एनर्जी इनिशिएटिव्हचे सहअध्यक्ष मार्शियन सोल्ताऊ यांच्या मते, हे २०३५ पर्यंत प्रत्यक्षात येऊ शकते. सध्या, त्यांची टीम कॅसिओपेआ प्रकल्पावर काम करत आहे, जे मोठ्या उपग्रहांना उच्च पृथ्वीच्या कक्षेत पाठवले जाणार आहे.
उच्च कक्षेत पाठवलेले उपग्रह सौर ऊर्जा निर्माण करून पृथ्वीच्या दिशेने पाठवतील. या प्रकल्पाची क्षमता अमर्याद असल्याचे सोल्ताऊ म्हणतात. सैद्धान्तिकदृष्ट्या यामुळे वर्षे २०५० पर्यंत संपूर्ण जगाला ऊर्जा पुरवता येणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे, अंतराळात सौरऊर्जेचा पुरवठा मुबलक आहे आणि पृथ्वीच्या उच्च कक्षेत मोठ्या उपग्रहांसाठीही भरपूर जागा आहे. पृथ्वीच्या भूस्थिर कक्षाभोवती एक लहान पट्टी दर वर्षी शंभर पट अधिक सौर ऊर्जा प्राप्त करते. २०५० मध्ये पृथ्वीवर एवढी ऊर्जा मानव वापरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उपग्रह असे काम करणार…
कारखान्यात बनवलेल्या लाखो छोट्या मॉडेलचे मिश्रण करून हे उपग्रह बनवले जाणार आहेत. रोबोटच्या मदतीने ते अंतराळात जोडले जातील. हे रोबोट्स त्यांची देखभाल आणि सर्व्हिसिंगही करतील, अशी माहिती समोर येत आहे. उपग्रह सौर ऊर्जेचे हा-फ्रिक्वेंसी रेडिओ लहरींमध्ये रूपांतर करतील आणि अँटेनाच्या माध्यमातून त्या पृथ्वीवर पाठवतील. त्यानंतर या रेडिओ लहरींचे विजेत रूपांतर केले जाणार असल्याचे समजते. प्रत्येक उपग्रह दोन गिगावॅट वीजनिर्मिती करण्यास सक्षम असेल. सूर्यप्रकाश पृथ्वीवर विखुरलेल्या स्वरूपात येतो; मात्र, अंतराळामध्ये असे काहीही घडत नसल्याचे सांगण्यात आले आहे.