पुणे : सुखी संसाराच्या तब्बल ५५ वर्षांनंतर एकमेकांच्या सहवासातून मुक्त होणेे किती वेदनादायी असते, हे न सांगणंच बरं. अखेर कौटुंबिक वाद पुढे आला अन् होत्याचं नव्हतं झालं. पत्नीवर जीवापाड प्रेम असूनसुद्धा निर्लज्ज पत्नीच्या वारंवार होणार्या छळाने घटस्फोटाद्वारे दूर जावं लागलं. पण यामध्येही दैनंदिन गरजा आडव्या आल्याने पोटगीचा विषय न्यायालयात गेला, अन् चक्क नवरोबास उच्यशिक्षित घटस्फोटित पत्नीकडून पोटगी देण्याच्या निर्णयावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
सुखी संसाराचा गाडा चालवीत असताना अचानक प्रसंग कसे उद्भवतात हे येणारा काळच ठरवीत असतो. ज्येष्ठ दाम्पत्यामध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याने पतीने पत्नीला तिच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पोटगी देण्याचे आदेश दिल्याचे अनेक निकाल आपण पाहिले आणि आतापर्यंत ऐकलेसुद्धा आहेत. मात्र, येथील एका जोडप्याच्या न्यायप्रविष्ट वादात न्यायालयाने ८३ वर्षीय पतीला दरमहा २५ हजार रुपयांची अंतरिम पोटगी देण्याचा आदेश ७८ वर्षीय पत्नीला दिला आहे. संसाराची ५५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी २०१९ साली घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश राघवेंद्र आराध्ये यांनी हा निकाल दिला.
पतीच्या बाजूने एवढ्या मोठ्या रकमेचा पोटगीचा आदेश दिल्याचे राज्यातील, तसेच पुण्यातील हे पहिलेच प्रकरण असल्याचा दावा अर्जदार पतीच्या एका महिला वकिलाने केला आहे.
पोटगीसंदर्भात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय…
सर्वोच्च न्यायालयाने वैवाहिक वादाच्या प्रकरणात पोटगीची रक्कम ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, न्यायालयातील कामकाजादरम्यान दोन्ही पक्षांना त्यांची मालमत्ता आणि दायित्वे यांचा खुलासा अनिवार्यपणे करावा लागेल. तसेच न्यायालयात अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासूनच पोटगीचा निर्णय घेतला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, देखभालीची रक्कम दोन्ही पक्षांच्या स्थितीवर अवलंबून आहे. पत्नीची गरज, मुलांचे शिक्षण, पत्नीचा व्यावसायिक अभ्यास, तिचे उत्पन्न, नोकरी, पतीची स्थिती असे सर्व मुद्दे पाहावे लागतील. दोन्ही पक्षांची नोकरी आणि वयही पाहावे लागेल. या आधारे महिलेला किती पैसे द्यायचे हे ठरवले जाईल. यामध्ये पतीवर सुद्धा पत्नीकडून अन्याय झाले असल्यास घटस्फोटानंतर पती कमवीत नसल्यास किंवा पत्नीची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यास पत्नीकडून पतीला पोटगी देणे बंधनकारक असणार आहे.
दाम्पत्याच्या लग्नाच्या नात्याला ५५ वर्षांनंतर वेगळे वळण प्राप्त झालेल्या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणे गरजेचे आहे. या नाट्यमय प्रकरणाचा सविस्तर वृत्तांत असा की, घटस्फोट आणि पोटगीचा दावा करणारे ८३ वर्षीय अर्जदार हे एका नामांकित शिक्षण संस्थेचे संचालक आहेत. तर याच शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची ७८ वर्षीय पत्नी विराजमान आहे. सतीश आणि दया (दोघांची नावे बदलली आहेत) या दाम्पत्याचे १९६४ मध्ये लग्न झाले. त्यांच्या सुखी संसाराच्या वेलीवर दोन मुली जन्मास आल्या. सध्या त्या विवाहित आहेत. पतीने संचालकपदाचा राजीनामा द्यावा, तसेच संस्थेतून आणि घरातून निघून जावे म्हणून दया यांच्याकडून त्यांना गेली अनेक वर्षे वारंवार त्रास दिला जातो आहे.
पती-पत्नीचं पटत नसेल तर कायद्याप्रमाणे दोघांनाही घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे. केवळ पत्नीच नाही तर अन्यायग्रस्त पुरुषांनादेखील पोटगी मिळू शकते. त्यासाठी सकारात्मक बाबींचा उलगडा करावा लागतो. यामध्ये प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते. या निकालातून पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे.
अॅड. वैशाली चांदणे (वकील)
वारंवार मानसिक छळ करूनही पती सतीश प्रेमाखातर हा सगळा त्रास सहन करीत आहेत. मात्र, निर्लज्ज पत्नीला नवरोबा सतीशकडून कधी दुखविण्याचा प्रयत्न झाला नाही. कालांतराने दया यांना तिच्या कर्मानेच म्हणा दुर्धर आजार झाला, तेव्हा सतीश यांनी प्रेमासाठी दयाची खूप काळजी घेतली. खर्या प्रेमाच्या पोटीच म्हणा दयाचा दुर्धर आजार लवकरच पूर्णपणे बरा झाला. तिच्या आजारपणात सतीश यांनी सर्वतोपरी काळजी घेतली. पत्नीकडून होणारा छळही प्रेमापोटी सहन केला. अर्जदाराला शुगर आणि हृदयविकाराचा त्रास आहे. त्यांना वेळेवर जेवण आणि औषधे घ्यायची असतात. अशी परिस्थिती असतानाही पत्नीकडून त्यांची काहीच काळजी घेतली जात नव्हती, असे दाव्यात नमूद आहे. पत्नीकडून होणार्या त्रासाला कंटाळून अखेर सतीश यांनी घटस्फोट मिळावा म्हणून दावा दाखल केला.
सतीश यांच्या वकिलांना यश
संसाराचा सुरळीत गाडा चालविणारे सतीश हे एका शिक्षण संस्थेचे संचालक आहेत. ते सध्या ८३ वर्षांचे असून, त्यांची पत्नी सुद्धा याच शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी आहे. पत्नीकडून सतीश यांचा वारंवार मानसिक छळ केला जात होता. तरीही आपल्या सच्चा प्रेमाखातर सतीश हे दिल्या जाणार्या मानसिक छळाचा नित्यनियमाने त्रास सहन करीत आहेत.
जेव्हा सतीश यांची ५५ वर्षांपूर्वीची दैनंदिन वाटचाल ऐकून घेतली, तेव्हा भावनांना पाझर फुटला, असे सतीश यांचे वकीलपत्र स्वीकारणार्या अॅड.वैशाली चांदणे यांनी आपले मत व्यक्त केले. वकिलीपत्रात त्यात दोघांनी एकमेकांवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपदेखील केला आहे.
पतीकडे कोणताही उत्पन्नाचा स्रोत नसेल व त्याची पत्नी कमावती असेल व त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू असतील तर पतीदेखील हिंदू विवाह कायदा १९५५ चे कलम २४ नुसार पोटगी मिळावी म्हणून दावा दाखल करू शकतो, असा युक्तिवाद केल्याने अखेर अॅड. चांदणे यांना यश आले. न्यायालयाने अर्जदार सतीश यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल दिला. दरमहा २५ हजाराची पोटगी पत्नीने पतीला द्यावी, असा ऐतिहासिक आदेश दिला.