पुणे : आगामी काळात येणाऱ्या राजकीय परिस्थितीमध्ये सर्व समविचारी पक्षांना एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी काॅंग्रेसनं पुढाकार घ्यायला हवा. देशात व्यापक समविचारी पक्षांची आघाडी होणं आणि पर्यायी विरोधी पक्ष उभा करण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. आता काँग्रेस पक्षानं लोकशाही बळकट करून नेतृत्व करायची भूमिका घेतली पाहिजे. पुढील प्रवास हा खडतर असून त्याची चिंता वाटते असे परखड मत व्यक्त करत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ट नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला.
दरम्यान चव्हाण म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही टिकविण्यासाठी तयार केलेली चौकट म्हणजे संविधान आहे. लोकशाही धोक्यात असल्यानं ती टिकविण्यासाठी दुसरी सामाजिक क्रांती आपल्याला करावी लागणार आहे. सध्या भारतीय राज्यघटनेला सुरुंग लावण्याचे काम सुरू असून हा धोका निर्माण झाला आहे. राजकीय पक्ष हे संसदीय लोकशाहीचा आधार आहेत. राजकीय पक्ष संघटना दुर्बल होणे, ही चिंतेची बाब आहे. संपूर्ण देशात चातुवर्ण्य व्यवस्था येतोय की काय, अशी भीती वाटत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक समतेवर आधारित चळवळ उभी करावी लागणार आहे.