मुंबई | Maharashtra Politics – सध्या राज्यातील सत्तासंघर्षाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र ही लढाई दिवसेंदिवस काही ना काही कारणांमुळे पुढे ढकलली जात आहे. अखेर आज (7 सप्टेंबर) कोर्टात पुन्हा एकदा या सुनावणीला पुढची तारीख देण्यात आली आहे. ‘निवडणूक चिन्हांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीला स्थगिती देऊ नये’, असा अर्ज मंगळवारी (7 सप्टेंबर) शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. त्यावर, आज न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर तातडीने सुनावणी घेण्यात आली. या घटनापीठाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. यावर आता 27 सप्टेंबरला सुनावणी होऊन निर्णय येणार आहे.
निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निर्णय न घेण्याचे लेखी आदेश दिले आहेत का अशी विचारणा घटनापीठाने सुनावणीत केली. याशिवाय दोन्ही पक्षांची बाजू समजून घेतली. यानंतर घटनापीठाने 27 सप्टेंबरला या प्रकरणी दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून निर्णय देऊ, असं स्पष्ट केलं. तसंच निवडणूक आयोगाला 27 सप्टेंबरपर्यंत या प्रकरणात कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, शिंदे गटानं याआधी शिवसेना पक्षावर आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर आपला हक्क असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे त्यासाठी अर्ज केला होता. याला ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत या प्रकरणी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यापासून रोखावं अशी मागणी केली होती. या सुनावणीनंतर आता निवडणूक आयोग या प्रकरणात निर्णय घेऊ शकणार की नाही हे 27 सप्टेंबरलाच स्पष्ट होणार आहे.