मुंबई | Schools In The State Will Be Started – आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी राज्यातील शाळा सुरू होण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, १३ जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हा कार्यक्रम होणार आहे. तसंच अन्य शाळा १५ जूनला सुरू होणार आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे.
यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळा संदर्भात निर्णय घेतला जाईल. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाची नेमकी परिस्थिती कळेल. त्यानंतर शाळा सुरू करण्यापूर्वी चाइल्ड टास्क फोर्स असेल किंवा आरोग्य विभाग आम्ही त्यांच्याशी चर्चा करु आणि निर्णय घेऊ. तसंच ,वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल लवकरच लागणार असल्याचंही म्हटलं आहे.
दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र यंग लीडर्स एस्पीरेशन डेव्हलपमेंट आणि स्वजीवी प्रोग्राम संदर्भात माहिती दिली. त्या म्हणाल्या, एक क्रांतिकारी पाऊल शालेय शिक्षण विभाग टाकत आहे. महाराष्ट्र यंग लीडर्स एस्पीरेशन डेव्हलपमेंट आणि स्वजीवी प्रोग्राम या कार्यक्रमाचं आज उद्घाटन करण्यात आलं. एचसीएलकडून २० ते २५ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तसंच विज्ञान शाखेत गणित विषय घेऊन 60 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणारे विद्यार्थी या कार्यक्रमात प्रवेश घेऊ शकणार आहेत. यामध्ये फक्त प्रशिक्षणच नाही तर नोकरीशी सुद्धा विद्यार्थ्यांना सांगड ही कंपनी घालून देणार आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.