नदी आपली माता आहे व ती स्वच्छ राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हा अध्यात्माद्वारे पर्यावरण संरक्षणाचा वैज्ञानिक संदेश प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्याकडून आरतीच्या माध्यमातून दररोज दिला जात असतो.
जर्मनीसारख्या प्रगत देशामध्ये पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी किती काळजी घेतली जाते, हे ऐकून कोणालाही आश्चर्यच वाटेल. शोधनिबंध सादर करण्यासाठी जर्मनीला (पश्चिम) जाण्याची मला संधी मिळाली होती. त्यानंतर मी ‘टेक्निकल विद्यापीठ म्युनिच, प. जर्मनी’ या विद्यापीठात काही काळ संशोधनाचे कार्य केले. माझे संशोधक मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. झिगलर मला दररोज सायंकाळी ६ नंतरच भेटत असत. तेव्हा एक दिवस मी त्यांना विनंती केली की, ‘सर, मी आपणास दुपारी ३ वाजता भेटू शकतो काय?’ तेव्हा ते म्हणाले, अहो, सध्या येथे ‘समर’ (उन्हाळा) सुरू आहे आणि या काळात येथील अनेक लोक, विशेषतः पर्यटक, लेकवर (तळ्यामध्ये) पोहण्यासाठी येत असतात.
त्यामुळे आम्हाला दर पाच मिनिटांनी त्या तळ्यातील पाण्याचे नमुने घेऊन ते पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी त्यावर उपाययोजना (ट्रीटमेंट) करायची असते. मी तुम्हाला दुपारी ३ वाजता कसा भेटू शकेल? सरांचे उत्तर ऐकून मी तर आश्चर्यचकित झालो. आमची विद्यापीठे अथवा महाविद्यालये लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी लोकाभिमुख संशोधन का करीत नाहीत? याबद्दल मी आजही दुःखी असतो, तर माजी कुलगुरू म्हणून ‘निरूत्तर’ होतो. म्हणून तर देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांनंतरदेखील आपणास ‘नमामि गंगे’ अथवा ‘नमामि चंद्रभागा’ असे प्रकल्प हाती घ्यावे लागत आहेत. आमच्या देशातील नद्या आज प्रचंड प्रदूषित झाल्या आहेत. म्हणून ‘नमामि गंगे’ हा केंद्र सरकारचा अत्यंत मानाचा प्रकल्प असून, जून २०१४ मध्ये तो सुरू करण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी २०,००० कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही करण्यात आलेली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून स्वच्छ पाणी गंगेत सोडणे, गंगेच्या भोवतालचा परिसर सुंदर करणे, पृष्ठभागावरील पाणी स्वच्छ ठेवणे, तीरावर विविध वनस्पतींची लागवड व वनीकरण करणे, लोकांमध्ये या प्रकल्पाची जाणीवजागृती करणे, औद्योगिक कारखान्यांमुळे प्रदूषित होणारे पाणी शुद्ध करूनच गंगेत सोडणे आणि गंगेच्या तीरावर ‘गंगा ग्राम’ची उभारणी करणे इ. उद्देश या संपूर्ण प्रकल्पात निश्चित करण्यात आलेले आहेत.
अशाच प्रकारचा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने ‘चंद्रभागा’ नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ‘नमामि चंद्रभागा’ म्हणून घेतला आहे. याबद्दल खरे म्हणजे महाराष्ट्र शासनाचे अभिनंदनच करावयास हवे. अकराव्या शतकात भक्त पुंडलिकाने बहुजन समाजाच्या पारलौकिक कल्याणासाठी कानड्या-सावळ्या एकेश्वर विठ्ठलाची पंढरपुरी भूवैकुंठात चंद्रभागेच्या वाळवंटी स्थापना केली.
तेराव्या शतकात भागवत धर्माचा ज्ञानदेवांनी पाया रचला व संत तुकाराम महाराजांनी त्याचा कळस केला आणि संतांची वारकरी परंपरा महाराष्ट्राच्या भूमीत भक्कमपणे रुजली. आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी/भाविक पंढरपुरी चंद्रभागेच्या वाळवंटी जमा होतात, चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेतात आणि तृप्त होतात. चंद्रभागा म्हणजे मूळची भीमा नदी; परंतु पंढरपुरी ही नदी दिसते जणू ‘चंद्राची कोर’ म्हणून ‘चंद्रभागा’. भीमा नदी सह्याद्री पर्वतामध्ये वसलेल्या ‘भीमाशंकर’ जे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, या पवित्र ठिकाणाहून उगम पावते. भीमा नदीची खरी दुरवस्था पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराने केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून पवना नदीत रासायनिक कारखान्यातील दूषित पाणी व मैला मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे पवना नदी मलमूत्र वाहून नेणारे गटारच झाले आहे आणि या नदीचा पुणे या सांस्कृतिक राजधानीमध्ये मुळा-मुठेच्या पात्रात संगम होतो, तो घाणीचा आणि प्रदूषणाचा.
इतके भयानक प्रदूषण या नदीतील पाण्याचे झाले आहे की, या पाण्यात जलपर्णी, शेवाळ, बेशरम, पाणकणीस इ. वनस्पती फोफावल्यामुळे नदीच्या पाण्याची प्रचंड दुर्गंधी येते. नद्यांतील घाणीचे व प्रदूषणयुक्त पाणी शेवटी ‘उजनी’ या जलाशयात येते व तेथे हे साठवून ठेवण्यात येते आणि आषाढी-कार्तिकी एकादशीच्या वेळी हेच पाणी चंद्रभागेत सोडले जाते. लाखो वारकरी, भाविक चंद्रभागेच्या त्या पाण्यात स्नान करून १२ ते १८ तास रांगेत उभे राहून पांडुरंगाचे दर्शन घेतात. खरं म्हणजे वारकर्यांचा व या प्रदूषणयुक्त पाण्याचा पुनर्विचार व्हावयास हवा. म्हणूनच ‘नमामि चंद्रभागा’ हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा, असे कुणासही वाटेल. संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी असणार्या आळंदी येथील इंद्रायणीचे पाणीदेखील तेवढे स्वच्छ व शुद्ध नाही. परंतु आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या माध्यमातून प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या पुढाकाराने इंद्रायणीतीरी भक्कम दगडी घाट बांधून प्रदूषण काही प्रमाणात कमी करण्याचा निश्चितच प्रयत्न झाला आहे.
पंढरपूरलादेखील चंद्रभागा नदीच्या तीरावर दगडी घाट बांधणे, सुशोभीकरण, वनीकरण इ. सुधारणा करणे आवश्यक आहे. याशिवाय २० लाख वारकरी/भाविकांची स्नानाबरोबरच शौचालयाची व्यवस्था नदी प्रदूषित होणार नाही याची काळजी घेऊन करावी लागेल. हा विचार वारकर्यांत, भाविकांत, सर्वसामान्य लोकांत व शासनदरबारी उतरविण्यासाठी विश्वशांती केंद्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी २०११ पासून आळंदी येथे इंद्रायणीची आरती व २०१६ पासून पंढरपूर येथे चंद्रभागेची आरती दररोज सायंकाळी सूर्यास्तानंतर सुरू केली आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीला हा उपक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
प्रा. डॉ. एस. एन. पठाण
लेखक माजी कुलगुरू व आळंदी येथील विश्वशांती केंद्राचे समन्वयक आणि सल्लागार आहेत.
संपर्क ९८२२३६२६०३