चेन्नई | N Valarmathi Passed Away – इस्त्रोमधून (ISRO) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इस्त्रोचा आवाज हरपला आहे, वैज्ञानिक एन. वलारमथी (N Valarmathi) यांचं कार्डिएक अरेस्टने निधन झालं आहे. आत्तापर्यंत इस्त्रोच्या जेवढ्या मोहीमा झाल्या त्यामध्ये काऊंटडाऊन दरम्यान जो आवाज ऐकू यायचा तो वलारमथी यांचा होता. तर वलारमथी यांचं (Chandrayaan-3) हे शेवटचं मिशन ठरलं. आता त्यांचा हा आवाज पुन्हा कधीच ऐकू येणार नाहीये.
वलारमथी या तामिळनाडूच्या अलियायुर येथे राहत होत्या. त्यांनी शनिवारी चेन्नईमध्ये अखेरचा श्वास घेतला. तसंच इस्त्रोचे माजी डायरेक्टर पी.वी. वेंकटकृष्णन यांनी ट्विट करत वलारमथी यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. वलारमथी यांचं इस्त्रोमध्ये मोठं योगदान होतं. त्यांच्या आवाजाचं प्रत्येकजण कौतुक करत होतं. तर चांद्रयान-3 ही त्यांची फायनल असायमेंट ठरली. वलारमथी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
इस्त्रोचे माजी डायरेक्टर पी.वी. वेंकटकृष्णन यांनी ट्विट करत वलारमथी यांच्या निधनाची माहिती दिली. “इस्त्रोच्या भविष्यातील मोहिमांच्या काउंटडाउनसाठी वलारमथी मॅडमचा आता आवाज येणार नाही. चांद्रयान 3 ही त्यांची अंतिम काउंटडाउनची घोषणा होती. अनपेक्षित निधन. खूप वाईट वाटतंय. प्रणाम!”, असं वेंकटकृष्णन यांनी म्हटलं आहे.