जगातला प्रत्येक माणूस आपल्या स्वार्थाच्या जोरावर खोटं बोलतो; परंतु तो कधी खोटं बोलतो आणि कधी सत्य बोलतो हे शोधण्यासाठी हजारो वर्षांपासून शास्त्रज्ञ प्रयत्न करताना दिसतात; मात्र त्यांना त्यात यश मिळालेलं नाही. अमेरिकेसह इतर देशांमध्ये आता केवळ पॉलिग्राफ चाचणी पुरेशी नाही, तर त्यासोबत काही वक्र प्रश्न खोटं पकडण्यासाठी अधिक प्रभावी ठरतात, असं सरकारचं मत आहे.
अमेरिकेच्या ‘नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या मतानुसार केवळ १५ मिनिटांच्या प्रशिक्षणाने, बहुतेक लोक पॉलिग्राफ चाचणी चुकवू शकतात. इंटर-एजन्सी ग्रुपने खोटं बोलण्यात पारंगत असलेल्या लोकांना शोधण्यासाठी शीर्ष मानसशास्त्रज्ञांसोबत काम केलं आहे. त्यांच्या मते हेरांच्या कारवाया किंंवा इतर राष्ट्रीय सुरक्षा धोके तपासण्यासाठी सरकारने पॉलिग्राफ चाचणीवर अवलंबून राहू नये, कारण त्याचे परिणाम खूप चुकीचे येऊ शकतात. खोटं शोधण्याचा विज्ञानावर आधारित मार्ग आहे का, याचं उत्तर होकारार्थी आहे; परंतु असे कोणते प्रश्न लोकांना विचारावेत; जेणेकरून त्यांचं खोटं सहज पकडता येईल?
इंटर-एजन्सी ग्रुपने शंभराहून अधिक संशोधन प्रकल्पांवर शीर्ष मानसशास्त्रज्ञांसह ११८ कोटी रुपये खर्च केले आहेत. ते खोटं बोलण्यात पारंगत असणार्यांचा शोध घेत आहेत. अशा लोकांमध्ये पाच गुण असतात. हे लोक संभाषणात पारंगत असतात. त्यांच्या देहबोलीवर जास्त विश्वास ठेवू नये. त्यांना अनपेक्षित प्रश्न विचारावेत; जेणेकरून खोटं बोलणार्याला विचार करण्याची संधी मिळणार नाही. त्यांच्याबाबत सांख्यिकीय पुराव्याचा वापर करावा. खोटं बोलणार्यांना पटकन आव्हान देऊ नये, असंही मानसशास्त्रज्ञ सांगतात.
मानसशास्त्राचे प्राध्यापक एल्डर्ट व्हर्ज म्हणतात की, संकेतावरून क्वचितच शरीराच्या भाषेचे अंदाज लावता येतात. संशोधनाच्या पुनरावलोकनात आढळून आलं की, टक लावून पाहणं कधीही विश्वासार्ह सूचक म्हणून पाहिलं जाऊ शकत नाही. हे एक मिथक आहे. यासाठी १९७८ मध्ये कैदी मनोरुग्णांच्या परस्परवर्तनाचा अभ्यास करण्यात आला आहे. खोटं बोलणार्याला कधीही दुसर्याच्या डोळ्याला डोळे भिडवून बोलता येत नाही, हेही मिथक ठरतं. तेव्हा सध्या राजकारणात नजरेला नजर भिडवून बोलण्याचं जे आव्हान, प्रतिआव्हान दिलं जात आहे त्याला किती गांभीर्याने घ्यायचे आणि खरे मानायचे हे आपणच ठरवायचे.