राजस्थान पोटनिवडणुकीत मतदानादरम्यान महसूल अधिकार्यास कानशीलात लगावल्या प्रकरणी अपक्ष उमेदवार नरेश मीनाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी (दि.१४) त्याला अटक करून जयपूरला आणण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह १० कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
देवळी- उनियारा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. यावेळी अपक्ष उमेदवार नरेश मीणाने उपविभागीय दंडाधिकारी अमित चौधरी यांना कानशिलात लगावली. याचे महसूल विभागात संतप्त पडसाद उमटले. राजस्थान प्रशासकीय सेवा अधिकारी संघटनेने नरेश मीनाच्या अटकेची मागणी केली. महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनांनी मीनाच्या अटकेची मागणी करत, अटक न झाल्यास गुरुवारपासून संपूर्ण राज्यात पेन डाऊन संप करण्याचा इशारा दिला होता. तर मीना याने प्रशासनाला आव्हान देत गावात आंदोलन केले. प्रशासनावर दबाव टाकता यावा म्हणून त्याने आपल्या समर्थकांना सामरावता गावात मोठ्या संख्येने लाठ्या-काठ्या घेऊन जमण्यास सांगितले. नरेश मीणा समर्थकांना आवर घालण्यासाठी पाच पोलीस ठाण्यांमधून पोलिसांना पाचारण करावे लागले. यावेळी हिंसाचार आणि जाळपोळ झाल्यानंतर नरेश मीणा आणि त्यांच्या १०० हून अधिक समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, नंतर मीना पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला. या घटनेनंतर आरएएसच्या अधिकाऱ्यांनी नरेश मीणाला अटक करण्याची मागणी केली होती. या घटनेनंतर राजस्थानच्या टोंकमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
कोण आहे अमित चौधरी?
अमित चौधरी हे राजस्थान प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. ते सध्या टोंक जिल्ह्यातील मालपुरा येथे एसडीएम आहेत. अमित चौधरी हे राजस्थानमधील २०१९ बॅचचे RSS अधिकारी आहेत. अमित चौधरी हे मूळचे अलवरचे रहिवासी आहे. मालपुरा टोंकमध्ये एसडीएम होण्यापूर्वी अमित कुमार चौधरी झालावाडच्या मनोहरपुरा पोलिस ठाण्यात, डुंगरपूरच्या चिकली, हिंदोली बुंदी, अस्वर झालावार आणि नागौरमध्ये एसडीएम होते.