नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात मागील काही दिवसांपासून ईडीकडून गांधी कुटुंबाची चौकशी सुरु होती. काँग्रेसचे राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करण्यात येत होती. मात्र, आता ईडीकडून हेराल्डचे कार्यालय सील करण्यात आले आहे. ईडीच्या परवानगीशिवाय हेराल्ड हाऊस कोणालाही उघडता येणार नाही असे आदेश देण्यात आले आहेत. हेराल्ड हाऊस सील होणे हा गांधी कुटुंबासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
या घटनेनंतर काँग्रेस मुख्यालयाजवळ सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मुख्यालयासमोरील रास्ता देखील बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती आहे. काल दिवसभर हेराल्डच्या कार्यालयात ईडीकडून कागदपात्रांची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर आज कार्यालय सील करण्यात आले आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक घोटाळा झाला असल्याच्या आरोपाखाली गांधी कुटुंबाची चौकशी सुरु आहे. काही दिवसांपासुर्वी राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली होती. तेव्हाच सोनिया गांधी यांना देखील समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्या आजारी असल्याच्या कारणाने त्यांची चौकशी पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, मागील हप्त्यात सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलने देखील केली होती.