मुंबई | Tejaswini Pandit’s Video Viral – सध्या राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत आलं आहे. महाविकासआघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असून ते सध्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथे आहेत. एकीकडे राजकीय तर्कविर्तक लावले जात असताना दुसरीकडे अनेकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. यामध्ये आता मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं चक्क महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची परिस्थिती पाहता ‘रानबाजार’ वेबसीरिजमधील एका सीनचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
तेजस्विनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची सुरूवात अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या संवादाने होते. या सीनमधील त्यांचा एक संवाद प्रचंड गाजत आहे. तो संवाद म्हणजे “सामान्य माणसांचा आता राजकारण्यांवर विश्वास राहिलेला नाही.” तेजस्विनी पंडितने सध्या सुरु असलेलं राजकीय वातावरण पाहून हा व्हिडीओ शेअर केला असल्याचं दिसत आहे. तसंच तेजस्विनीने हा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी यावर विविध कमेंट करायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, ‘रानबाजार’ या वेबसीरिजचे दिग्दर्शक आणि अभिनेते अभिजीत पानसे यांनी देखील फक्त ‘रानबाजार’ शब्द दिसेल अशी पोस्ट सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केली होती. ‘रानबाजार’ या वेबसीरिजला प्रेक्षकांचा अजूनही भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.