सरन्यायाधीश पदाचा मान सिंधुदुर्गच्या सुपुत्राला!

मुंबई : (Selection of Chief Justice Uday Lalit) सध्या सरन्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले एन व्ही रमणा यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे पदभार स्वीकारणार आहेत. न्यायमूर्ती लळीत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचे सुपुत्र आहेत. त्यामुळं न्या. लळीत यांच्या सरन्यायाधीश पदाच्या निवडीची बातमी कोकणवासियांसाठी अभिमानाची आणि कौतुकाची आहे.

देशाच्या सर्वोच्च पदावर देवगड तालुक्याच्या सुपुत्राची निवड होत असल्याने सिंधुदुर्ग वासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. जून 1983 मध्ये न्यायाधीश उदय लळीत यांनी वकिलीला सुरुवात केली. उदय लळीत यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्ष वकिली केली. नंतरच्या काळात ते दिल्लीत गेले. तब्बल सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधीतज्ज्ञ सोली सोराबजी यांचे निकटचे सहकारी म्हणून काम केले. अनेक वर्ष लळीत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करत आहेत.

दरम्यान, माजी केंद्रीय दळणवळण मंत्री ए राजा यांच्यासह अनेक बड्या असामी आरोपी असलेला 2G स्पेक्ट्रम घोटाळा खटला दिल्लीच्या विशेष न्यायालयात सुरु झाला. त्यावेळी केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या दोन तपास यंत्रणाच्या वतीने अभियोग चालवण्याची जबाबदारी, केंद्र सरकारने घेतलेले आक्षेप जुगारुन सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या विश्वासाने जेष्ठ वकील उदय लळीत यांच्यावर टाकली. यासारख्या अनेक केसेसमध्ये त्यांनी नैपुण्यपूर्ण काम केले आहेत.

Prakash Harale: