मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणींचा सामना करत आहेत. सरकार गेल्यानंतर आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील त्यांना गमवावे लागले आहे. असे असताना आपल्या नेत्याला अडचणीत बघून कल्याणमधील एका महिला कार्यकर्त्याने देवीच्या चरणी अनोखी प्रतिज्ञा केली आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय संकट संपत नाही तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होत नाही तोपर्यंत त्या पायामध्ये चप्पल घालणार नाही. अशी शपथ आशा रसाळ यांनी घेतली.
मंगळवारी कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गा माता मंदिरामध्ये देवीच्या चरणी आशा रसाळ यांनी साकडं घातलं. यावेळी त्यांनी पूजाऱ्यांच्या साक्षीनं दुर्गाडी किल्ल्यावर शपथ घेतली. देवीला साकडं घातलं. जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत त्या पायामध्ये चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली.
राज्यातील महिलांना आवाहन…
आशा रसाळ यांनी ही प्रतिज्ञा घेतल्यानंतर राज्यातील तमाम महिला वर्ग तसेच सामान्य जनतेला उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन केलंय. त्या म्हणाल्या, ‘ आज असत्याचा विजय होतो असं दिसतंय. परंतु देवाच्या समोर सगळे सारखेच असतात. म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरातील दुर्गाडी किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी स्थापना केलेल्या जगदंबा मातेच्या चरणी आलो आहोत .देवीला हे साकडं घातलं आहे की, सत्याचा विजय होणार आहे. सत्याला थोडं लढावं लागतं. तो संघर्ष चालू आहे. जोपर्यंत आमचे पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत मी अनवाणी राहीन, चप्पल घालणार नाही. तमाम माता-भगिनींना विनंती करते की, तुम्ही सत्याच्या बाजूने उभ्या रहा, असे आवाहन करते.