भारतीयांना २०४० पर्यंत चंद्रावर पाठवणार; इस्रो प्रमुखांची माहिती

भारतीयांना २०४० पर्यंत चंद्रावर पाठवणार

भारतीयांना २०४० पर्यंत चंद्रावर उतरवण्याचे आमचे ध्येय असल्याचे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी सांगितले आहे. परंतु त्यासाठी आपल्याला अवकाश स्थानक उभारावे लागेल, कारण चंद्रावर मानवाला पाठवण्यासाठी मध्यवर्ती माध्यम असणे आवश्यक आहे. त्यासाठी सूक्ष्म गुरुत्वाकर्षण संशोधन आणि अनेक विशेष अवकाश मोहिमांची उद्दिष्टे साध्य करावी लागतील, असेही त्यांनी म्हंटले आहे.

रविवारी झुंझुनू जिल्ह्यातील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS) पिलानी इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित दीक्षांत समारंभात इस्रो प्रमुखांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘अमेरिकन उद्योगपती एलन मस्क चंद्रावर मानव पाठवण्याची आणि मंगळावर समाज स्थापन करण्याची योजना आखत आहेत. लाखो लोकांसाठी तेथे (मंगळावर) वसाहत बांधण्याची त्यांची योजना आहे आणि लोकांना एक तिकीट देऊन तिथे जाता येईल.’

पुढे सोमनाथ म्हणाले, ‘मला वाटते अंतराळ पर्यटनाचे क्षेत्र लक्षणीयरित्या उदयास येईल. या क्षेत्रातही भारतासाठी प्रचंड क्षमता आहे. आम्ही अतिशय किफायतशीर अभियांत्रिकीसाठी ओळखले जातो. आमची चंद्र आणि मंगळ मोहीम ही जगातील सर्वात कमी खर्चाची मोहीम आहे आणि या दोन्ही मोहिमांमुळे आम्हाला खूप सन्मान मिळाला आहे.’

इस्रो प्रमुख म्हणाले, आम्ही पुढील ५ ते ६० वर्षांच्या भविष्यासाठी कार्यक्रमांची रूपरेषा देखील तयार केली आहे. सरकारने यासाठी ३० हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्पही जाहीर केला आहे. अवकाश कार्यक्रमाच्या इतिहासातील आजचा दिवस हा एक मोठा ऐतिहासिक क्षण आहे.

बीट्स पिलानीच्या दीक्षांत समारंभाला देशातील अनेक नामवंत शास्त्रज्ञही उपस्थित होते. एस सोमनाथ विद्यार्थ्यांना म्हणाले, जेव्हा अमेरिकन लोक चंद्र मोहिमेबद्दल विचार करू लागले तेव्हा त्यांना अंतराळ कार्यक्रमात मोठी गुंतवणूक करावी लागली. त्यांना त्यांच्या राष्ट्रीय संपत्तीपैकी सुमारे २०-३० टक्के गुंतवणूक करावी लागली, जेणेकरून ते आजच्यासारखी विज्ञान क्षमता विकसित करू शकतील. आता अंतराळात प्रवेश करणे खूप सोपे झाले आहे. आजकाल कोणीही उपग्रह प्रक्षेपित करू शकतो.

हे विद्यापीठे आणि संस्थांमध्ये देखील केले जाऊ शकते आणि उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च इतका कमी झाला आहे की आज अंतराळात सुमारे २० हजार उपग्रह आहेत. ५० हजाराहून अधिक उपग्रह किमान मिनिमम-लेटेंसी दूरसंचार सेवा आणि इंटरनेट सेवा प्रदान करत आहेत, जो खरोखरच आश्चर्यकारक आकडा आहे,’ असे त्यांनी सांगितले.

Rashtra Sanchar: