पुणे | Pune News – पुण्यातील (Pune) कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघातांचं (Accident) सत्र सुरूच आहे. आताही पुन्हा एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. काल (13 ऑगस्ट) रात्री एका अवजड ट्रकच्या चाकाखाली सापडून ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर पोलिसांनी ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसंच कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ही महिन्यातील तिसरी घटना आहे.
रविवारी रात्री एक ज्येष्ठ महिला कात्रज-कोंढवा रस्त्यावरून निघाली होती. त्यावेळी भरधाव कंटेनरनं त्या महिलेला धडक दिली आणि ती महिला कंटेनरच्या चाकाखाली सापडून तिचा जागीच मृत्यू झाला. प्रभावती पांडुरंग अनभुले (वय 70) असं मृत महिलेचं नाव आहे. या भीषण अपघातानंतर कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघातांचं सत्र सुरू आहे. 5 ऑगस्ट रोजी एका भरधाव ट्रकनं 11 वाहनांना धडक दिली होती. या अपघातात एक दुचाकीस्वाराच मृत्यू झाला होता. तसंच गेल्या आठवड्यात झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता तर पाच जण गंभीर जखमी झाले होते.