एसजीपीसीने पटकावले विजेतेपद

पुणे : अमृतरच्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी) संघाने ध्यानचंद अकादमी संघाचा ४-१ गोलने पराभव करून एसएनबीपी संस्था आयोजित १६ वर्षांखालील कुमार हॉकी राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद जिंकले. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील हॉकी मैदानावर झालेल्या या सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांचा खेळ समान झाला. सामन्याच्या ३७व्या मिनिटाला ध्यानचंद अकादमी संघाने आपले खाते उघडले. कृष्णा मोहन याने ३७व्या मिनिटाला गोल केला. मात्र, त्यांचा आनंद फारकाळ टिकला नाही. साहिबप्रीत सिंगने ४४व्या मिनिटाला गोल करून एसजीपीसी संघाला बरोबरी साधून दिली.

उत्तरार्धात मात्र, एसजीपीसी संघाने कमालीचा वेगवान खेळ करताना ध्यानचंद अकादमी संघाच्या बचावफळीवर सातत्याने दडपण टाकले. उत्तरार्धात सुरुवातीलाच ४५व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर सुखराज सिंगने संघाची आघाडी वाढवली. त्यानंतर दोन मिनिटांत दोन गोल करून एसजीपीसी संघाने विजेतेपदावर नाव कोरले. प्रथम ५८व्या मिनिटाला गुरारिश सिंग, तर ५९व्या मिनिटाला कर्णधार जगजीत सिंगने गोल केला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत अन्वर हॉकी सोसायटी संघाने यजमान एसएनबीपी अकादमी संघाचा ६-२ गोलने पराभव केला.

निकाल :
एसजीपीसी, अमृतसर ४ (साहिप्रीत सिंग ४४वे, सुखराज सिंग ४५वे, गुरारिश सिंग ५८वे, जगजित सिंग ४५ वे मिनिट) वि.वि. ध्यानचंद अकादमी १ (कृष्णा मोहन
३७वे मिनिट).
तिसरा क्रमांक – अन्वर हॉकी सोसायटी ६ (शाहरुख अली ३रे, ४९वे मिनिट, केतन कुशवा २४वे मिनिट, दिपू रावत २७वे मिनिट, शेखर धौनक ३०वे मिनिट,. आशिष कुमार ५७वे मिनिट) वि.वि. एसएनबीपी अकादमी २ (विघ्नेस बि?्हा ३२वे, अमृत पावरा ३९वे मिनिट).

वैयक्तिक पारितोषिके
गोलरक्षक – राहुल पाल (ध्यानचंद अकादमी) बचावपटू – गुरकित सिंग (एसजीपीसी) मध्यरक्षक – विशाल पांडे (ध्यानचंद अकादमी) आक्रमक – आकाश पाल (ध्यानचंद अकादमी) स्पधेर्चा मानकरी – अरबाझ (ध्यानचंद अकादमी)

Sumitra nalawade: