मुंबई | Shahaji Bapu Patil On Sanjay Raut – नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सडकून टीका केली आहे. तसंच संजय राऊतांनी शिंदे गटाबाबत (Shinde Group) मोठा दावा देखील केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचा एक मोठा गट अस्वस्थ आहे, असं वक्तव्य राऊतांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
“एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक मोठा गट अस्वस्थ असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. काही आमदार एकनाथ शिंदेंसोबत अयोध्येला गेले नव्हते. ही गडबड नेमकी चाललीये तरी काय? हे येत्या काही दिवसात समजेलच”, असा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे.
“मुख्यमंत्र्याच्या अयोध्या दौऱ्यात दर्शन घेण्यापेक्षा शक्तीप्रदर्शनाचा जास्त विषय होता. तुम्हाला शक्ती प्रदर्शन करण्यासाठी अयोध्या कशाला हवीये? तुम्ही तुमच्यासोबत जे गुंड होते त्यांना शुद्ध करायला शरयू नदीच्या किनारी घेऊन गेला होतात की काय?”, असा खोचक सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला. यावर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठा गुंड म्हणजे संजय राऊत. त्यांनी अडीच वर्षांपूर्वी गुंडगिरी आणि मोठी चोरी केली आहे. शिवसेनेचे 55 आमदार त्यांनी कसे शरद पवारांच्या झोळीत टाकले? हे आम्हालाही समजलं नाही. हा माणूस खरा गुंड आणि चोर आहे. आधी शिवसेना आणि भाजपची युती होती, त्यामुळे आम्हाला बहुमत मिळालं. पण त्यांनी रातोरात काळंबेर करून सगळं बिघडवून टाकलं”, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.