कऱ्हाड | Shahajibapu Patil On Ajit Pawar – राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र अजूनही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधकांडून एकनाथ शिंदे गट आणि सरकारवर टीका होताना दिसत आहे. याच दरम्यान, काल (6 ऑगस्ट) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. यावरूनच आता बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी अजित पवारांना खोचक शब्दात टोला लगावला आहे.
सुधाकर नाईक यांच्या वेळी झालेल्या बंडामुळे पावणेदोन महिने मंत्रालय बंद होते. त्यांच्याच मंत्रिमंडळात अजित पवार राज्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची फार काळजी करण्याचं कारण नाही. राज्यात चांगला कारभार सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तार थोड्याच दिवसात मार्गी लागेल, असा टोला शहाजीबापू पाटील यांनी अजित पवारांना लगावला.
काही राजकीय परिस्थिती आल्यावर चार दिवस मागे- पुढे होतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार चांगला चालला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतलेले निर्णय अजित दादांनी पत्रकारांसमोर ठेवावेत, असं देखील शहाजीबापू पाटील म्हणाले.