इस्लामाबाद : संसदेनं अविश्वासाचा ठराव मंजूर करत इमरान खान यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हायला भाग पाडलं. खान यांनी आज पंतप्रधान पदाचा राजिनामा दिल्यानंतर आता नव्या पंतप्रधानाची निवडही पाकिस्तानी संसदेनं केली आहे. शहबाज शरिफ आता पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान असणार आहेत.
आज रात्री आठ वाजता शरिफ पंतप्रधान पदावर विराजमान होतील. अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर खान यांच्या PTI पक्षातील सर्वच नेत्यांनी आज कनिष्ठ सभागृहाचा राजिनामा देऊ केला आहे. पाकिस्तानात मागील काही आठवडाभरात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी यामुळे आता काही अंशी थांबणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून निवड झालेले शहबाज हे नवाज शरिफ यांचे लहान भाऊ आहेत. नवाज शरिफ तब्बल ३ वेळा पंतप्रधान पदावर विराजमान झाले होते. मात्र २०१७ मध्ये त्यांना पायउतार व्हायला भाग पाडण्यात आलं. शरिफ यांच्या राजिनाम्यानंतर खान पंतप्रधान बनले. मात्र नेतृत्वाचा अभावगुण, आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली नाचक्की यामुळे पाकिस्तानी जनतेचा रोष त्यांनी ओढावून घेतला होता.